पर्सनॅलिटी
पर्स
मंगेश पाडगावकर सरांना एकदा भेटले तेव्हा आपल्या लाडक्या कविवर्यांनी फटकन गुगलीसारखं एक वाक्य टाकलं... "काही बायकांना पर्सनॅलिटी असते बरं का"... साक्षात कविवर्यांकडून अशी कॉमेंट..जीवाचं फुलपाखरू झालं !
"विचार तरी मी असं का म्हणालो," सर म्हणाले...
"का सर?"
"अग, काही बायकांना 'पर्स'नॅलिटी असते कारण त्यांच्या हातात 'पर्स' असते नं !"
माझी आधीच भरमसाठ भरलेली पर्स त्या दिवशी खऱ्या अर्थाने भरून पावली असणार!
''पर्स साफ करायची झाली, पण वेळच मिळत नाही गं"... शंभरातल्या 99 बायका हे वाक्य बोलतातच बोलतात, त्या 99% मधलीच मी एक!
माझ्या पर्सचं अंदाजे वजन 4-5 किलोच्या आसपास असतं. ते कमी व्हावं म्हणून मी बरेच उपाय केले. चामडी पर्सच्या ऐवजी कापडी पर्स घेतली, रोज रात्री चिल्लर काढून मुलांच्या मनी बँक मध्ये टाकून बघितलं, मोबाईल हातात बाळगायला लागले...पण काही उपयोग नाही, ही बया नेहमीच फुगलेली.
माझ्या आज्जीची पर्स म्हणजे, तिचा बटवा.. चांगला कोपरापर्यंत हात जाईल इतका खोल.
त्याच्यात ती पानाचा डबा ठेवायची, कधी त्यातून जर्दाळु निघायचे, कधी 2 पैसे-5 पैसे
काढून द्यायची , कधी विभुती, कधी
मोरपीस निघायचं.. आम्हा मुलांना वाटायचं आज्जी जादूगार आहे, एक दिवस ससा पण काढेल.
पर्स आज्जीची असो की आजच्या करिअर वुमनची. त्यात बाई स्वतःचा एक छोटासा संसार घेऊन फिरत असते. म्हणजे एखादीच्या कपाटात तशा 4-5 पर्स सुद्धा असू शकतात ..
अगदी लुई व्हीताॅच्या एखाद्या शिष्ट पर्सपासून ते रात्री पार्टीला जाताना न्यायच्या वीतभर ठोकळयासारख्या पर्सपर्यंत. पण रोज वापरायची एक अगदी आपली पर्स असते, ज्यात हक्काने
सगळं टाकायचं असतं, आणि ती ते अगदी तिचा श्वास अडकेपर्यंत मुकाट्याने टाकूनही घेते.
एका मैत्रिणीची अशीच कोणत्याही क्षणाला बाळंत होईल अशी पर्स माॅलमध्ये हरवली. सांत्वन आणि मदत दोन्ही करायला मी तिच्या घरी पोहोचले तेव्हा वातावरण अत्यंत सुतकी होते. "तुम्हीच समजवा हिला " असं म्हणून तिचे मिस्टर आत गेले. हिचे डोळे भरून आलेले...मलाही भरून आलं .."खूप पैसे गेले का गं? "
ती हमसाहमशी रडत म्हणाली, " पैशाचं सोड गं, माझे US वरून आणलेले जॉगिंग शूज आणि हेअर ड्रायर गेला गं!!!"
म्हणजे हि पर्स मधे जॉगिंग शूज आणि हेअर ड्रायर घेऊन फिरायची???!!!!
तुम्हाला खरंच सांगते, माझं मन म्हणतंय की हिची पर्स हरवली नसणार..माॅलच्या कठड्यावरून उडी मारून पर्सने आत्महत्या केली असणार!!!
खरंतर माझीही पर्स तशी म्हटलं तर 4-5 महिन्यांची गर्भारीणच ...
(क्रमशः)
पर्स
(उत्तरार्ध)
आज मनाशी पक्कं ठरवलं, पर्स रिकामी करायचीच. समोर पेपर पसरला, आणि हिला अक्षरशः ओतली त्याच्यावर...
चाव्या, सेफ्टी पिन्स, रबर ,लिपस्टिक, हेअरब्रश, नेलकटर, हॅंड सॅनिटायझर, टिश्यूपॅक, सतराशेसाठ व्हिजिटिंग कार्ड्स, 4-5 देवांचे फोटो, 2 बाबांच्या विभुतीची पाकीटं ,'डी-मार्ट'ची जुनी बिलं, चेकबुक, वाॅलेट, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, छोटी डायरी, छोट्या चेनच्या कप्प्यात कानातले इमिटेशन ज्वेलरीचे 3 जोड आणि माझ्या धाकटीच्या गळ्यातली सटवाई (!?..देवा ,आता ही कधी आली इथे !), एक दुरुस्तीला टाकायचं रीस्टवाॅच , मोबाईल चार्जर, असंख्य पासपोर्ट साईज फोटो आणि रिक्षावाल्याने दिलेली चिल्लर !
बापरे इतकं घेऊन फिरते मी!
आता ह्यातलं फेकायचं काय?
जुनी बिलं फेकता येतील. चिल्लर कमी करता येईल, 'लिपस्टिक फेक' असं खाली उतरून देवाने जरी सांगितलं तरी मी फेकणार नाही. लिपस्टिक ना लावता बाहेर फिरणाऱ्या समस्त स्त्री वर्गाबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. खरा चेहरा जगाला दाखवायला धाडस लागतं राव !
देवाचे फोटो तरी कसे काढायचे नं ,एखादा हवाच बरोबर, अडीनडीला!... मुलांचे त्याच्या school I'd वरून काढून जपून ठेवलेले फोटो, इथे-तिथे टाकले तर हरवून जातील नं.. त्यांचं बालपण जपून ठेवलंय एका कप्प्यात... बाबांची विभुती माझ्या आईने दिलीय, तसा माझा खूप जास्त नाही विश्वास ...पण त्या विभुतीच्या पिशवीत 80 वर्षाची माझी सुरकुतलेली आई आहे.. तिला कसं टाकू.
घड्याळ जुनं झालंय, टाकलं तरी चालेल.. पण नवर्याने पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला घेतलंय, मी घालत नाही आता, त्याचे सेल बदलत राहते..त्याची टिकटिक पर्समध्ये असली की जाग असल्यासारखं वाटतं.
बाकी सगळं हवंच.. ड़ेबिट कार्ड, आधार कार्ड, चेकबुक म्हणजे मी जिवंत असल्याची साक्ष देणारे निर्जीव साक्षीदार... अजब आहे ना..आपल्या अस्तित्वाची ही अशी खूण आज जिथे-तिथे पटवावी लागते.
एकदा सगळं नीट झटकून, पुसून घेतलं...हळूच लक्षात आलं, पर्सचं आतलं अस्तर जरा विरलंय, कुठे कुठे हलके ड़ाग लागलेत... पोक्त, मायाळू मध्यमवर्गीय गृहिणीसारखी वाटली मला ती.. जुन्या लुगड्याची गोधडी शिवून लेकरांना ऊब देणारी...
नवीन पर्स घेण्याचा विषय मग तिथेच संपला. चालतेय तेवढी चालवूया की, मला ओझं होतंय खरं तिचं.. पण माझी सगळी ओझी तिच्यातच तर सामावलीयत ...
या पर्ससारखीच काही गाठोडी मनात घेऊन फिरत असतो आपण. खूप ओझं वाटायला लागलं तर कधीतरी उघडावीत हळुवारपणे...
जे दुखतंय- खुपतंय ते काढून टाकावं आणि जे ऊबदार, प्रेमळ, आश्वासक आहे त्याचा सुगंध परत अनुभवावा.
उद्या परत नवरा म्हणणार "किती गं जड पर्स, कमी कर जरा तो कचरा'...
मी आणि पर्स हळूच एकमेकींकडे बघून हसू आणि सगळ्या कचऱ्यासकट परत एकदा एकमेकीनं सोबत बाहेर पडू...
-सोनाली लोहार
Comments
Post a Comment