वानप्रस्थाश्रम




"अहो आई, किती आवाज करताय तुम्ही किचनमध्ये. सकाळचे सहा पण नाही वाजलेले. मी तुम्हाला कितीदा सांगितले आहे की रात्री उशिरापर्यंत आमचे ऑफिसचे कॉल्स, त्यानंतर मुलांचे अभ्यास ह्यात उशीर होतो झोपायला. त्यात माझ्या थायरॉईडमुळे मला कशीबशी सकाळीच झोप लागते. एवढेही नाही का समजून घेता येत तुम्हाला!!!" समोरच्या फ्लॅटमधून कुमुदिनीचा येणारा चढा आवाज प्रमिलाताईंना नवीनच होता. 

कुमुदिनीला त्या गेले बारा तेरा वर्ष बघत होत्या. तेव्हा ती, तिचा नवरा आणि मुलगा असे तिघेच आले होते नवीन फ्लॅट मध्ये रहायला. नवीन शेजार कोण म्हणून प्रमिलाताई डोकावून गेल्या, "छान लावला आहेस ग नवीन संसार, काही लागले तर सांग हो. सासुसासरे कुठे परगावी असतात का?" 

"नाही, पुण्यातच. पण त्यांना खूप आग्रह करूनही नाही आले ते इकडे. हातीपाई धड आहोत तोपर्यंत आम्ही वेगळे रहाणार असा त्यांचा निर्णय आहे" कुमुदिनी हळू आवाजात हिरमुसुन बोलली. 

"असू दे, असू दे!!" असे म्हणून त्या निघाल्या त्यांच्या सकाळच्या वॉकला. 

नंतर बरीच वर्ष त्या कुमुदिनीची धावपळ बघत होत्या. मुलाला पाठीशी बांधून निघायची ती सकाळी ऑफिसला, वाटेत त्याला पाळणाघरात सोडून, ती संध्याकाळी उशिराच परत यायची त्याला परत घेऊन. आल्याआल्या स्वयंपाक करून पोराबरोबर जेवून अभ्यास घ्यायची त्याचा, खेळायची त्याच्याबरोबर. नवरा उशिराच यायचा घरी, अगदी शांत, सगळं सुरळीत चालू होतं.  

पाचसहा वर्षांपूर्वी सासरे गेल्यावर मात्र सासूला घेऊन आली स्वतःकडे. कधी भांडण नाही की वाद नाहीत, गुण्यागोविंदाने चालू होतं सगळे. सासू मदत करायची घरात.

कुमुदिनीची पण चाळीशी उलटून गेली होती आता. तिला कामाच्या ताणाने थायरॉईड चिकटला होता. तरीही पोरगी हसतमुख होती खरी... "आज काय बरं बिनसले हिचे?" चहाचे आधण टाकत प्रमिलाताई विचार करत होत्या. 

संध्याकाळी खाली सगळ्या आज्या बसायच्या पारावर, कधी गप्पा, कधी गीतेचे पाठ, कधी अजून काही. साठेबाई, कुमुदिनीच्या सासूबाई हळूहळू रुळल्या होत्या. पण त्यांना घरी जायची भारीच लगबग असायची, "अहो कुकर लावायचाय अजून, आज जरा सकाळच्या पोळ्या कमी पडतील बहुतेक, बाईने कमी केल्या आहेत, जरा लाटते घरी जाऊन. चला निघायला हवे मला..." असे म्हणून निघून जायच्या. जसा काही ह्यांचाच संसार रामरगाडा होता हाकायचा अजूनही. 

"कुमुदिनी, आलीस का ग ऑफिसमधून. हे घे खडीसाखर. बस जरा इथे दोन मिनिटं, टेक जरा थोडं" कुमुदिनी गाडी पार्क करून येताना बघून तिला प्रमिलाताईंनी पकडलेच.

"काय ग, आज का पिन उडाली होती तुझी सकाळी? नाही म्हणजे तुला मी कधीच चिडलेले बघितलं ऐकल नाहीये ग. खूप दगदग होतीय का तुझी" 

"जाऊदे!!! काय सांगू तुम्हाला. सासूबाईंचा मला खूप आधार आहे हो, खूप मदत करतात घरात त्या. पण आता ना त्यांची मदत अंगावर यायला लागली आहे. मी जरा स्वयंपाकघरात शिरले की मागे येऊन उभ्या, "हेच कर, ते करू नकोस. एवढाच भात लाव, तेवढीच आमटी कर. आता पोरं मोठी होत आहेत. हट्टीपणा करून त्या रोज संध्याकाळची भाजी करतात, अगदी नाकाएवढी. मग ती कोणालाच पुरत नाही. वर ह्याचं म्हणणे असे की वाया जायला नको अन्न. पण आधीच कमी पडतंय त्याचे काय. सकाळी स्वयंपाकाला बाई आहे तिला रोज शिकवत बसतात स्वयंपाक. ह्या दहाच्या ठोक्याला झोपणार आणि पाचला उठून खुडबुड सुरू. पहाटे पहाटे सांडशी, गाळणे आणि भांडी आपटतोय आपण हेही त्यांना जाणवत नाही. फ्रीज, अवन, कपाटे, दारं पण आपटून लावतात. 

परत दुपारी तेच, वरकामाची बाई आली की तिची निम्मी कामे ह्याच करतात. बायकांना काय बरेच ना..ह्यांनी आराम करावा आणि आम्हाला आता संसार करून द्यावा एवढीच काय ती अपेक्षा आहे माझी. त्या नव्हत्या तेव्हा मी करतच होते ना संसार. अजूनही मी नवी नवरी आहे असे समजतात त्या. गुरुवारीच संडास बाथरूम साफ करायला लागतात, जेव्हा आम्ही ते काम विकेंडला ठरवलेले असते. रोज धुणं लावायची घाई, अंघोळींची घाई...पोरं पण आता चिडचिड करू लागली आहेत आजीवर" 

"हं, प्रकरण बरंच गंभीर आहे म्हणजे. तू बोललीस का त्यांच्याशी शांतपणे एकदा" 

"अहो सकाळच्या आवाजांबद्दल तर मी अगदी रडून पण सांगितले आहे. माझ्या थायरॉईडमुळे मला कशीबशी शांत झोप लागणार पहाटे की ह्यांची काकडआरती चालूच. त्यांचं म्हणणं, 'लवकर उठून कामे पटापट होतात'. समजून घ्यायचंच नाही मुळी की सुनेचे रुटीन काय आहे. तिच्या जबाबदाऱ्या काय आहेत. फार त्रास होतोय हो मला रोजचा" 

"थांब मी बोलेन एकदा त्यांच्याशी हं, माझ्या पद्धतीने" असे म्हणून प्रमिलाताईंनी बोलणे आवरते घेतले

दोनतीन दिवसांनी साठेबाई आल्या खाली नेहेमीप्रमाणे आणि सात वाजले रे वाजले की लागल्या पळायला घरी..."अहो साठेबाई जरा टेका थोडावेळ इथे"

"अहो पण कुकर राह्यला आहे ना लावायचा!"

"का कुमुदिनी तुम्हाला सांगते का लावायला?"

"नाही हो, ती बिचारी बिझी असते खूप म्हणून मीच आपलं. ती तर नकोच म्हणते"

"मग झालं तर, बसा! सध्या मी भैरप्पाचे 'पर्व' पुस्तक वाचतीय. त्यात वानप्रस्थाश्रम बद्दल सुंदर वर्णन आहे. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपल्या की वृद्ध लोक गावाच्या जवळच्या वनात जाऊन रहात असत. तिथेच अगदी साधं जीवन चालू राहत असे त्यांचे. एकदा का मुलांच्या हाती संसार, सत्ता दिली की आपली लुडबुड त्यात नको हा खरा मतितार्थ होता ह्या कृतीत. मग लागलीच गरज पोरांना, तर पोरं येत असत सल्ला मागायला. तेव्हा ही वृद्ध मंडळी सल्ला देत असत. आणि हो, तोच सल्ला अमलात आणायचा असा हट्ट नाही हं. ह्या पद्धतीतून मग हळूहळू विरक्तीकडे वाटचाल चालू व्हायची त्यांची. आता बघा, तुम्ही आम्ही सध्याच्या फ्लॅट संस्कृती मध्ये असे वनात तर जाऊ शकत नाही ना. मग उपाय खूप सोपे आहेत. मदत मागितली की भरभरून करायची पण एक महत्वाचा मंत्र लक्षात ठेवायचा, 'हा माझा संसार नाही. मुले समर्थ आहेत त्यांचा संसार करायला' 

आणि मग तुमच्याकडे खूप वेळ राहील स्वतःकडे बघायला, स्वतः जरा मौजमजा करायला. मन मारून ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या करायला हीच तर सुसंधी आहे दिलेली देवाने आपल्याला बोनस वर्षातून"

"अहो प्रमिलाताई, खरं तर माझी सून मला हेच सांगत असते वेळोवेळी की 'आई तुम्ही तुमचे आयुष्य जगा आता, मजा करा'. मलाच वाटतं की, बिचार्याना माझी होईल तेवढी मदत झाली तर काय हरकत आहे"

"हेच चुकत तुमचे. ते येतील ना जेव्हा आणि जी मदत लागेल त्यासाठी. आणि तेव्हा तुम्ही देखील हसत हसत मदत करा, उपकाराची भावना नको की 'बघा तरी मी सांगत होते' हा विचार नको"

"पटलं हो, अगदी पटलं मला. उद्यापासून मीही येते तुमच्या बरोबर सकाळी चालायला आणि तुमची ती भिशी पण करते जॉईन" असे म्हणून साठेबाई निघाल्या घरी

लिफ्ट मधून उतरल्या तर कुकरच्या शिट्या वाजतच होत्या आणि कुमुदिनीने देवापुढे छान उदबत्ती लावली होती, मुलं अभ्यास करत होती (घरात पूर्वीसारखी शांतता होती). साठेबाई हातपाय धुवून देवाला नमस्कार करून, जेवून घेऊन, त्यांच्या खोलीत गेल्या, जाताना दार सावकाश बंद केले होते त्यांनी. त्यांना पटला होता प्रमिलाताईंचा वानप्रस्थाश्रम...


भावना जोशी दीक्षित (व्यक्त होणे महत्त्वाचे ह्याची जाणीव झालेली एक व्यक्ती)

Comments

Popular posts from this blog

सावित्रीबाई फुले आणि त्यांचे शिक्षणातील योगदान

करिअर

टॉपर